राज्यामध्ये ‘या’ जिल्ह्यांना विजांचा कडकडाट अन् वादळी वाऱ्यांसह ‘मुसळधार’ पावसाचा इशारा

Weather Update : राज्यात मान्सून जोरात आला आहे आणि विविध जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे वेधशाळेच्या माहितीनुसार, 13 जून रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. 13 जूनला राज्यभरात पावसाची स्थिती कशी असेल, ते जाणून घेऊया.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी येथे मध्यम ते हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत कमाल तापमान 32°C आणि किमान तापमान 29°C असेल. पुण्याचे हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे आणि काही भागात मध्यम पाऊस पडू शकतो. त्यामुळे नागरिकांनी छत्री आणि रेनकोट घेऊनच बाहेर पडावे. पुण्याचे कमाल तापमान 35°C आणि किमान तापमान 27°C असेल. कोल्हापुरात गेल्या पाच दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. उद्याही कोल्हापुरात ढगाळ वातावरण राहील, कमाल तापमान 31°C आणि किमान तापमान 27°C असेल.

हवामान विभागानुसार, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे. येथे वादळी वारे आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज आहे. नांदेड, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना पुढील तीन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागपूरचे तापमान उद्या 37°C कमाल आणि 25°C किमान असेल.

मराठवाड्यात जोरदार पाऊस पडला असून शेतकरी आनंदित झाले आहेत. मात्र, काही भागांत वादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. पुढील 48 तासांत छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, परभणी जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. छत्रपती संभाजीनगरचे तापमान उद्या 35°C कमाल आणि 29°C किमान असेल. राज्यातील विविध जिल्ह्यांत पाऊस जोरदार पडत आहे. या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे प्रशासनाने सांगितले आहे.

Leave a Comment