रेशन दुकानात येणार 4 जी ई-पॉस मशीन

Ration E-POS machine : रेशन दुकानातून धान्य घेताना बोटांचे ठसे ई-पॉस मशीनवर येत नाहीत. यामुळे नागरिकांना धान्य न घेताच रिकाम्या हाताने परतावे लागते. मात्र, आता प्रत्येक स्वस्त धान्य दुकानात ‘आय स्कॅनर’ देण्यात येणार आहे. तसेच 2-जी ऐवजी आता 4-जी ई-पॉस मशीन स्वस्त धान्य दुकानदारांना देण्यात येणार आहे.

एका वर्षापूर्वी जिल्हा पुरवठा विभागाकडून आधुनिक यंत्रसामग्रीची मागणी करण्यात आली होती. जिल्ह्यात स्वस्त धान्य घेणाऱ्या लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ झालेली आहे.

रेशन धान्य वितरणात पारदर्शकता येण्यासाठी शासनाने ई-पॉस यंत्रणा कार्यान्वित केली आहे. यामध्ये लाभार्थ्यांना बोटांचे ठसे घेऊन त्यांना धान्य दिले जाते. जिल्ह्यातील सर्वच रास्त भाव दुकानात ई-पॉस यंत्र आहे. मात्र, काही लाभार्थ्यांच्या बोटांचे ठसे पुसट झाल्याने अशा नागरिकांना स्वस्त धान्यापासून वंचित राहावे लागत होते.

विशेषतः गवंडी काम करणाऱ्या व्यक्ती, धुणीभांडी करणाऱ्या महिला यांना ही समस्या जाणवते. अशांना कुटुंबातील इतर व्यक्तींना आणून त्यांचे ठसे देऊन धान्य घ्यावे लागते. यामुळे आता आधुनिक पद्धतीचे ‘आय स्कॅनर गन’ दिले जाणार आहे. ज्या व्यक्तींच्या हाताचे ठसे ई-पॉस यंत्रावर येणार नाहीत, त्यांचे डोळे स्कॅन करून त्यांना धान्य देण्यात येणार आहे.

नवीन यंत्रामुळे वेळेची बचत

2-जी ऐवजी 4-जी नेटवर्कवर आधारित ई-पॉस मशीन देण्याची मागणी करण्यात येत होती. यासाठी रेशन दुकानदारांनी जानेवारी महिन्यात आंदोलन देखील केले होते. आता शासनाने जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना 4-जी नेटवर्कवर आधारित यंत्राचा पुरवठा केला आहे. यामुळे ग्राहकांच्या वेळेची बचत होईल. तसेच रेशन दुकानदारांची डोकेदुखी कमी होणार आहे.

मेपासूनस्वस्त धान्य दुकानदारांना नवीन ई-पॉस यंत्र व ‘आय स्कॅनर’चे वाटप करण्यात येणार आहे.

Leave a Comment