यंदा राज्यात भरपूर पाऊस! मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली माहिती

IMD Monsoon Alert : मुंबईच्या कुलाबा येथील प्रादेशिक हवामान केंद्राने पुढील तीन दिवस राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. विदर्भातील अकोला, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.

आयएमडीनुसार, येत्या पाच दिवसांत केरळमध्ये मान्सून येण्याची शक्यता आहे. भारताच्या मान्सून कोर झोनमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो, ज्याचा फायदा पावसावर अवलंबून असलेल्या कृषी क्षेत्रांना होईल. ईशान्य भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे, वायव्य भागात सरासरी आणि मध्य व दक्षिण द्वीपकल्पीय भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो. जूनमध्ये भारतात सरासरी पाऊस पडण्याची अपेक्षा आहे, असे हवामान खात्याने सांगितले आहे.

नैर्ऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनची पहिली शाखा मंगळवारी दक्षिण अरबी समुद्रात दाखल झाली. दुसरी शाखा बंगालच्या उपसागरातून पश्चिम बंगालसह पूर्वोत्तर राज्यांत आगामी 72 तासांत येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

देशातील अनेक भागांत सध्या तापमान खूप वाढले आहे, आणि उष्णतेच्या लाटेमुळे लोक त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज दिलासा देणारा आहे. IMD च्या अंदाजानुसार, यावर्षी देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो. येत्या पाच दिवसांत मान्सून केरळमध्ये येण्याची शक्यता आहे, त्यानंतर तो हळूहळू संपूर्ण देशभर पसरत जाईल. साधारणतः 10 दिवसांत महाराष्ट्रात मान्सून येईल. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यातील अनेक भागांत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

तीन दिवसांनंतर उष्णतेपासून दिलासा

आयएमडीचे प्रमुख मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, लवकरच देशाला उष्णतेपासून दिलासा मिळू शकेल. उत्तर-पश्चिम भारत आणि देशाच्या मध्य भागात तीन दिवसांनंतर उष्णता कमी होण्याची शक्यता आहे. 30 मे पासून उष्णतेची तीव्रता हळूहळू कमी होईल, कारण एक वेस्टर्न डिस्टर्बन्स जवळ येत आहे. अरबी समुद्रातून येणाऱ्या या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे आणि आर्द्रतेमुळे देशाच्या वायव्य आणि मध्य भागात गडगडाट होऊन पाऊस पडू शकतो, ज्यामुळे लोकांना उष्णतेपासून दिलासा मिळेल.

महाराष्ट्रात कधी येईल मान्सून?

हवामान खात्याच्या माहितीनुसार, पुढील पाच दिवसांत म्हणजेच 1 जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये येऊ शकतो. साधारणतः 10 दिवसांनी महाराष्ट्रात मान्सून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे 10 ते 11 जूनच्या दरम्यान मुंबईसह कोकणात मान्सून येईल. त्यानंतर 15 जूनपर्यंत कोकणातून सह्याद्रीचा घाट ओलांडून मान्सून खान्देश, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि त्यानंतर मराठवाडा, विदर्भातही पोहोचण्याची शक्यता आहे.

Leave a Comment